नवी मुंबई - लॉकडाऊन असताना घराबाहेर पडू नये, गरज असल्यास शासनाने दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टन्स ठेवून अत्यावश्यक गोष्टींची खरेदी विक्री करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी व ग्राहक यांच्या माध्यमातून सर्व नियम धाब्यावर बसविले जात होते. त्यामुळे बाजार समिती काही दिवस बंद करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांनी दिला आहे. पुढील आदेशापर्यत बाजार समिती बंद राहणार आहे. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती ही अत्यावश्यक सेवा म्हणून लॉक डाउनच्या काळात सुरू होती.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांची कोरोनाच्या अनुषंगाने संयुक्त बैठक सुद्धा झाली होती. या बैठकीत "सोशल डिस्टन्स" पाळून सर्व व्यवहार करावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचे कुठेही पालन होताना दिसत नव्हते, यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू शकेल अशी भीती निर्माण झाली होती. येथे येणारे नागरिक आणि व्यापारी सुद्धा कोणत्याही नियमांचे पालन करत नव्हते. मार्केट मध्ये प्रचंड गर्दी करत होते. त्यामुळे अखेर आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, फळे, कांदा बटाटा ,अन्नधान्य व इतर अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांच्या कडून घेण्यात आला आहे.