नवी मुंबई - उलवे येथील 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह वाशी पालिका रुग्णालयातून गहाळ झाला होता. याप्रकरणी दिवसभराच्या तपासाअंती मृतदेहाची अदलाबदल झाल्याची बाब समोर आली आहे. संबधित तरुणाच्या मृतदेहाला मुलीचा मृतदेह समजून तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उलवे येथील एका मुस्लीम तरुणाचा मृतदेह वाशी रुग्णालयातून गहाळ झाला होता. हा तरुण मूळचा पश्चिम बंगालचा आहे. आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला. खबरदारी म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी 9 तारखेला त्याचा मृतदेह वाशीतील पालिका रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याच दरम्यान दिघा येथील एका 18 वर्षीय मुलीचा काविळीने मृत्यू झाल्याने तिचाही मृतदेह चाचणीसाठी रुग्णालयात आणला होता. मृत तरुण व तरुणी यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर 14 मे रोजी दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले.
मुलीचे नातेवाईक नवी मुंबईतील दिघा परिसरात राहत असल्याने त्वरित मृतदेह घेण्यासाठी आले. यावेळी शवागारातील कर्मचाऱ्याने त्यांना मुलीच्या ऐवजी तरुणाचा मृतदेह ताब्यात दिला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या कुटुंबीयांनी देखील मृतदेह बाहेर न काढता त्याच दिवशी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
तरुणांचे नातेवाईक तीन दिवसांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आले असता मृतदेह सुपूर्द करण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करू लागले. पालिका आयुक्तांनी या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासात अखेर चार दिवसांनी मुलीच्या कुटुंबातील लोकांनी मुली ऐवजी अनोळखी तरुणाचा अंत्यविधी केल्याचे उघड झाले. हा मुस्लीम तरुणाचा असल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले. मुलाचा मृतदेह गहाळ झाल्याचे समजताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कोणाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदला-बदल झाली याचा तपास केला जात असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.