ठाणे - जांभूळ पाणी शुद्धीकरण केंद्राच्या उल्हासनदीवरील बंधाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. या बंधाऱ्याची संरक्षक भिंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्या खालील मोरीचा एक भाग खचला असून गावकऱ्यांचा दळणवळणाचा मार्गही धोक्यात आहे. मागील पाच वर्षांपासून गावकरी हा जीवघेणा प्रवास करत आहेत.
या बंधाऱ्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील अनेक गावे जोडली गेली आहेत. जांभूळ, वसत गावातील ग्रामस्थांना आपटी मांजार्ली, गोवीली, टिटवाळाकडे जाण्यासाठी तर आपटी मांजार्ली, दहागाव पोई या ग्रामस्थांना अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र, हा रस्ता धोकादायक झाल्याने गावकऱ्यांना २० ते २५ किलो मीटरचा वळसा घालून यावे लागत आहे.
हेही वाचा - रेल्वेतून वन्य पशुपक्षांची तस्करी; टोळीच्या म्होरक्यासह तिघे वनविभागाच्या जाळ्यात
या बंधाऱ्याच्या बाजुची संरक्षक भिंत देखील खचली आहे. भिंतीला तडे जाऊन त्यामधून पाण्याची गळती सुरू आहे. भिंत अचानक खचली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंतीवर असलेल्या रेलिंग तुटल्या आहेत. ग्रामस्थांनी बांबू लावून तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली. अनेक पर्यटक नदीवर येत असतात. त्यामुळे या बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बाबत एमआयडीचे अधीक्षक अभियंता राजाराम राठोड यांना विचारणा केली असता लवकरात लवकर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.