ठाणे: याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनासह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोन मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली.
खिडकीतून मृतदेह फेकला खाली: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश हा उत्तरप्रदेश मधील देवरीया जिल्हातील रहिवाशी आहे. तो उदरर्निवाहसाठी डोंबिवलीतील सोनारपाडा भागात मजुरीचे काम करत होता. मृत राजेश हा आरोपी दादूसोबत बसून कधी कधी दारू पित होता. त्यातच २५ मे ते २६ मे २०२३ रोजीच्या रात्रीच्या सुमारास सोनारपाडा भागातील श्रद्धा इमारतमध्ये राहणारा आरोपी दादू मटू जाधव उर्फ पाटील याने त्याचा मित्र विनोद पडवळशी संगनमत करून मृतक राजेशला श्रद्धा इमारतीमधील घरात नेले. यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी मृत राजेशवर दारूवाल्याला चुलगी केल्याच्या संशयातून लाकडी बांबूसह लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याने दोन्ही आरोपींनी मिळून राजेशचा मृतदेह इमारतीच्या खिडकीतून खाली फेकून दिला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घरातील गादीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून काढले.
आरोपींकडून गुन्ह्याची कबुली: या श्रद्धा इमारतीच्या खाली एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती आज (शुक्रवारी) सकाळी मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत राजेशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छदेनासाठी रवाना करण्यात आला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. यामध्ये मृतक राजेश हा दादूसोबत दारू पित असल्याचे समोर आले. त्यानंतर दोन आरोपींना संशयित म्हणून मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या दोघांनी मिळून राजेशचा खून केल्याची कबुली दिली.
दोन तासातच अटक: यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यांच्या तक्रारीवरून दादू मटू जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ या दोन मारेकऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही दोन तासातच अटक केली गेली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल लंबे करीत आहेत.
हेही वाचा: