ठाणे - कोरोना पॉझिटिव्ह असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्वारंटाईन सेंटरमधून फरार झाल्याची घटना जून महिन्यात घडली होती. हा आरोपी मध्यवर्ती पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. बाळू खरात (वय ४९ ) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - ठाणेकर गारठले; किमान तापमान १६ अंशावर
बाळू याने जून महिन्यात पत्नीचा खून केला होता. खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली असता, १६ जून रोजी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, त्याला कोरोना उपचारासाठी कल्याण-भिवंडी रोडवरील राजणोली नाका बायपासवरील टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात पोलिसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. मात्र, केंद्रातील गर्दीचा फायदा घेऊन तो तेथून फरार झाला होता. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भा.द.वीच्या विविध कलमांसह साथरोग प्रतिबंधक अधिनियानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
सहा महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात..
आज सकाळच्या सुमारास आरोपी बाळू उल्हासनगर मधील १७ सेक्शन परिसरात असल्याची बातमी मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी दिली. या आरोपीला पुन्हा कोनगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - विशेष : ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट