ठाणे - कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा वाढता कहर पाहून रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी ऍक्शन मोड बदलला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. मागील ४८ तासात वाढदिवस, हळद-कुंकू सोहळे आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या दोन पदाधिकऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर कोरोना काळातील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी डी मार्ट अस्थापनाविरोधात देखील कारवाईचा बडगा उगारला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांचा शासनाच्या आदेशाला हरताळ
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कठोक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. एकीकडे केंद्र सरकार कोरोनाला हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमाचा आयोजन करत कोरोना संकटाला आमंत्रण देत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिका व पोलिस प्रशासनातर्फे गर्दी न करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरण्याचे आवाहन केले जाते, मात्र असे असले तरी राजकीय पदाधिकारी मात्र कोरोना नियमांचे सर्रास पायमल्ली करताना दिसत आहेत.