ठाणे - कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने काल (शुक्रवार) 'चस्का' हुक्का पार्लरवर छापा मारून 100 हुन अधिक तरुण तरुणींना हुक्का पिताना रंगेहात ताब्यात घेतले होते. आता त्यापोठापाठ भिवंडीच्या गुन्हे शाखेच्या पथकानेही भिवंडीतील खाडीपार परिसरात जॉय हुक्का पार्लरवर रात्रीच्या सुमारास छापा मारून 25 ते 30 जणांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडीत हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा 'चस्का' नंतर 'जॉय' हुक्का पार्लरवर छापा हुक्का पार्लरचे फॅड मुंबईनंतर आता त्याला लागून असणाऱ्या शहरांमध्येही फोफावू लागल्याचे दिसत आहे. त्यातच भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरु असल्याचे दिसून येत आहे. असेच भिवंडीतील खाडीपार भागात कॅफेच्या नावाखाली जॉय हुक्का सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने काल (शुक्रवार) रात्रीच्या सुमारास हुक्का पार्लरवर छापा मारला. त्यावेळी 25 ते 30 तरुण-तरुणी हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या सर्वाना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फैजदारी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी आणि कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी कॅफेच्या नावाखाली खुले आम हुक्का पार्लर सुरू होते.
शहरातील हायप्रोफाइल भागात हुक्का पार्लर
जिल्ह्यातील विविध शहरात आणखी काही हायप्रोफाइल भागात अशा प्रकारे सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण तरुणींचा ओढा पाहता अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या बड्या व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे हुक्का पार्लर सुरू राहणे अशक्य असून त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.