ठाणे - सोसायटीमध्ये उच्छाद घातलेल्या भटक्या श्वानांना एका रिक्षात टाकून त्यांना दूर नेऊन सोडणे, अंबरनाथमधल्या एका हायप्रोफाइल सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर सोसायटीने श्वानांना मारून टाकल्याचा प्राणीमित्रांनी आरोप केल्याने पोलीस तपासाअंती सत्य काय ते समोर येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अंबरनाथ पश्चिमेला मोहन सबर्बिया नावाची उच्चभ्रू सोसायटी असून या सोसायटीच्या आवारात ९ भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला होता. सोसायटीत अस्वच्छता पसरवणे, रहिवाशांच्या मागे धावणे, लॉबीतील सोफे फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे सोसायटीतील काही सदस्यांनी त्या श्वानांना रिक्षात भरून दूर नेऊन सोडले. मात्र, यानंतर प्राणीमित्रांनी या श्वानांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोसायटीतील या ९ श्वानांपैकी आठ भटके श्वान बाहेर नेऊन सोडण्यात आले होते. त्यापैकी ३ श्वान काही दिवसांनी कल्याण-बदलापूर मुख्य मार्गावर सापडले. ज्यापैकी १ श्वान जखमी अवस्थेत होता. त्यामुळे सोसायटीच्या सदस्यांनी श्वानांना मारहाण केली असून इतर पाच श्वान सापडत नसल्याने त्यांना मारून टाकले असल्याची भीती सोसायटीतील प्राणीमित्र अर्चना नायर आणि मुकुंद पांडे यांनी व्यक्त केली. तर अशा पद्धतीने थेट श्वानांना बाहेर सोडण्याऐवजी प्राणी मित्रांना विश्वासात घेऊन श्वानांचे निर्बीजीकरण, स्थानांतरण आणि लसीकरण करता येऊ शकते, असे मत प्राणी मित्र संस्थेच्या रेखा रेडकर यांनी व्यक्त केले आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस सध्या हरवलेल्या पाच श्वानांचा शोध घेत आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत मोहन सबर्बिया सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू घाटे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही पोलिसांना सगळी माहिती दिली असल्याचे सांगत त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.