ठाणे - पावसाळ्याच्या सुरूवातीला मुठे आणि काळ्या खेकड्यांनी भाव खाल्ल्याचे चित्र दिसत आहे. आज रविवारीचा बेत आखून खवय्यांची शहरातील मासळी बाजारात तसेच गावातील नाक्यावर खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचा पावसाळ्यात लाकूड आणि झाडाची पाने विक्रीची व्यवसाय बंद झाल्याने आदिवासी रानभाज्या विक्री बरोबरच मुठे आणि काळे खेकडे विक्री करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांच्या रोजगारात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.
पावसाळा संपल्यानंतर शेत जमिनीच्या खाली, डोंगरदऱ्याच्या कपारीत, खोलवर बिळात काळे खेकडे तर शेतीच्या बांधावर मुठे जातीचे पिवळसर खेकडे मोठ्या प्रमाणात राहतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला हे खेकडे जमिनीवर येतात, त्यावेळी रात्रीच्या अंधारात आदिवासी बांधव वीज बत्ती, टॉर्च घेऊन हे खेकडे शोधून बाजारात विक्रीसाठी आणतात.
या दोन्ही प्रकारच्या खेकड्यांना या दिवसात खवय्यांकडून मोठी मागणी असते. त्यातच यंदाच्या मोसमात मध्यम आकाराचे काळे खेकडे किमान 6 नग 600 रुपयांना विक्री होत आहे. तर 100 रुपये डझन मुठे जातीचे खेकडे विकले जात आहेत. एकूणच पावसाळ्यात पहिल्या महिन्यात खाडी समुद्रातील मासेमारी बंद असली तरी आदिवासींनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मुठे आणि काळ्या खेकड्यांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मासळी बाजारात झुंबड उडाली आहे.