नवी मुंबई - पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तसेच मनसुख हिरेन या व्यवसायिकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केले होते. याप्रकरणी सचिन वाझे याला एनआयए कोठडीनंतर २३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन तळोजा कारागृहात दाखल झाली.
सचिन वाझेला २३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कारमध्ये आढळलेले स्फोटक व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी १३ मार्चला अटक करण्यात आले होते. विशेष एनआयएच्या न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला आज २३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर वाझे यांना तळोजा जेलमध्ये आणण्यात आले आहे. या कोठडीची मुदत संपल्यानंतर वाझे यांना पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.