ठाणे - नवरा बायकोने मिळून एका भटक्या श्वानाच्या अंगावर अॅसिड ओतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा गावातील महात्मा फुले नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात श्वानाच्या अंगावर अॅसिड ओतून त्याला गंभीर करणाऱ्या दाम्पत्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कयूम खान (४५), आफरीन खान (४०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी नवरा-बायकोचे नाव आहे.
..म्हणून श्वानाच्या अंगावर आरोपींनी ओतले अॅसिड
कयूम खान हा पत्नीसह कसारा गावातील महात्मा फुले नगर परिसरात राहतात असून त्याचे याच परिसरात गॅरेज आहे. काही दिवसांपासून एक भटका श्वान आरोपी कयूम खान यांच्या घराच्या पत्र्यावर झोपत असे, त्यामुळे या श्वानाला त्याने काठीने मारले होते. त्यावेळी श्वानाला मारू नका म्हणून कयूमच्या शेजारी राहणाऱ्या बाळू गांगुर्डे यांनी विरोध केला असता त्यांनाही खान कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली होती. मारहाण प्रकरणी बाळू गांगुर्डे यांनी कसारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही हा भटका श्वान आरोपीच्या घरावरील पत्र्यावर झोपत होता. त्यामुळे २९ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या ३च्या सुमारास दाम्पत्याने घरावरील पत्र्यावर झोपलेल्या त्या श्वानाच्या अंगावर अॅसिड ओतल्याने श्वान गंभीर जखमी झाला. तर शेजारच्या बाळू गागुंर्डेनी ही घटना त्यांच्या खिडकीतून पाहिली. मात्र, पुन्हा वाद नको म्हणून ते घराबाहेर नाही. त्यांनतर सकाळी गंभीर जखमी अवस्थेत श्वान पत्र्यावरून खाली उतरल्यानंतर गांगुर्डे यांनी त्याला गावातील पशुवैद्यकाकडे घेऊन गेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक शहरातील शरण फॉर अॅनिमल्स या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले.
श्वानाला पुढील दोन पाय निकामी
अंगावर अॅसिड ओतल्याने श्वानाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या सांध्याच्या खालील भागापासून त्याचे दोन्ही पाय कापून काढावे लागले, तसेच डाव्या कानात आणि कपाळाचा काही भागही निकामी झाला. याप्रकरणी पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल (पीईटीए) या संस्थेच्या सहकार्याने गांगुर्डे यांनी ९ नोव्हेंबर रोजी कसारा पोलीस ठाण्यात कयूम आणि त्याची पत्नी आफरीनविरोधात प्राणी अत्याचार कायद्याच्या विविध कलमानुसार कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- लॉकडाऊनमुळे राणीची बाग बंद, आठ महिन्यात ४ कोटींचा महसूल बुडाला