ठाणे - कोरोनाविरूद्ध उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंब्रा येथे घडला. या दोघांवर भादंवि कलम ३५३, १८८ अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रामध्ये अमृतनगरच्या शादी महल रोड येथे भाजीपाला व इतर दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. यावेळी दुकाने बंद न करण्याबाबत इतर दुकानदारांना चिथावणी देणे, शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणास्तव अमृतनगर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.