मीरा भाईंदर(ठाणे) - आज देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरनाला सुरुवात करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये देखील आज सकाळी कोविडच्या लसीकरणाला सुरुवात झाली. भाईंदर पूर्वेच्या जम्बो कोविड रुग्णालयातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर जोस्ना हसनाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गीता जैन, मनपा आयुक्त डॉ विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त नंदकिशोर लहाने, डॉ संभाजी वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दिवसभरात तीनशे जणांचे लसीकरण
मीरा भाईंदर शहरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भाईंदर पूर्वेचे जम्बो कोविड सेंटर, मीरारोड मधील वोकार्ड रुग्णालय, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय अशा तीन ठिकाणी लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. भाईंदर पूर्वेच्या जम्बो कोविड रुग्णालयात आज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविड लस दिल्यानंतर त्यांची संपूर्ण आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना तीस मिनिटे निगराणीत ठेवण्यात येणार आहे. ज्यांना आज लस दिली आहे, त्यांना पुन्हा 4 ते 6 आठवड्यानंतर आणखी एक लस देण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात 6 हजार 308 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
मीरा भाईंदर शहरातील तीन महत्त्वाच्या रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. भाईंदर पूर्वेच्या जम्बो कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी समीर संपत यांना पहिली लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर त्यांना अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मीरा भाईंदरसाठी जिल्हा प्रशासनाकडून ८ हजार २०० लस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ६ हजार ३०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पुढील काळात सदर लस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
आज आनंदाचा दिवस - महापौर
आज आनंदानाचा दिवस आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड लसीचे उद्घाटन झाले आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे, भविष्यात सामान्य नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होईल अशी प्रतिक्रिया महापौर जोस्ना हसनाळे यांनी दिली आहे. तर शहरातील खासगी व प्रशासनातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आजपासून लस देण्यात येणार आहे. ८ हजार लस शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या लसीमुळे आपन नक्कीच कोरनाला हरवू अशी प्रतिक्रिया उपायुक्त डॉ. संभाजी वाघमारे यांनी दिली आहे.