ठाणे - राज्य सरकारने कोरोना टेस्ट करण्यासाठी निर्धारित दर पत्रक काढले आहे. ठाणे मनपाच्या कळवा आणि राज्य सरकारच्या सरकारी रुग्णालयातही या टेस्ट मोफत केल्या जात आहेत. तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घरी जाऊन ही टेस्ट करणाऱ्यांसाठी नागरिकांकडून 2 हजार 800 रुपये आणि रुग्णालयात केल्या जाणाऱ्या टेस्टसाठी 2 हजार 200 रुपये एवढे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. मात्र, असे असूनही येथील खासगी टेस्टिंग लॅबमध्ये कोरोना टेस्टसाठी सरसकट 2 हजार 800 रुपये आकारले जात आहेत. यामुळे शासनाच्या दरपत्रकाला खासगी लॅब चालकांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी कोरोना अहवाल येण्यास उशीर होत असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची चिन्हेही दिसत आहेत.
जून महिन्याच्या अखेरीस 846 टेस्ट एका दिवसाला होत होत्या. आता टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी 1300 टेस्ट एका दिवसाला करण्यात आल्या. त्या 3 हजार पर्यंत नेण्याचा आमचा मानस, असल्याचे आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.
ठाणे मनपाने सर्वच लॅब्सला कोरोना टेस्टसाठी डॉक्टरांचे शिफारसपत्र बंद केले आहे. त्यामुळे ठाण्यात मागील तीन दिवसांपासून बाधित रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. लोक रांगा लावून टेस्ट करत आहेत. शिवाय ठाण्यात 2 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लोक घरातच बसून आहेत. यादरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन क्वारंटाईनच्या सुविधा वाढीवर भर देत आहे. शिवाय ठाण्यात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. नागरिक त्यांच्या सोईप्रमाणे कोरोनाची टेस्ट करत आहेत.
ठाण्यात नौपाडा कैडबरी जंक्शन घरातून टेस्ट आणि हॉस्पिटल्समध्ये स्वॅब टेस्टचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता टेस्टसाठी येणाऱ्या अडचणी कमी झाल्या आहेत. ठाणे मनपाने सर्व लॅब्सला रिपोर्ट कळवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कॉन्टेक्स्ट ट्रेसिंग आणि पुढे बाधित लोकांना बेड मिळण्यासाठी मदत होत आहे. पालिकेने डिजिटल माध्यमातून ऑनलाइन स्वतः माहिती भरून रुग्णांना मदत मिळावी, म्हणून एक अॅपही तयार केले आहे. यामुळे घरबसल्या रुग्णांना मदत उपलब्ध होणार आहे.