मीरा-भाईंदर (ठाणे) : भाईंदरच्या गोल्डन नेस्ट परिसरातील विलगीकरण कक्षात एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकानेच हा संतापजनक प्रकार केल्याचे समोर आल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. नवघर पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर महानगरपालिका मार्फत गोल्डन नेस्ट परिसरात एमएमआरडीएच्या इमारतीचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. यामध्ये संशयित कोरोना रुग्णांना ठेवण्यात येते. २४ मे रोजी पीडित महिला आणि तिची ७ वर्षाची मुलगी या दोघींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. गरम पाणी आणून देण्याच्या बहाण्याने रुममध्ये प्रवेश करत त्याने या महिलेवर अत्याचार केला. तसेच, त्यानंतर पीडितेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, २ जून ते ५ जूनपर्यंत वारंवार त्याने महिलेवर अत्याचार केला. मुलीच्या जीवाच्या भीतीने महिलेने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही.
त्यानंतर ती महिला घरी गेल्यावर, कुटुंबातील सदस्यांना तिने याबाबत सांगितले. याची माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी स्थानिक समाजसेवक रमजान खत्री यांना घटनेबाबत माहिती दिली. समाजसेवक रमजान खत्री यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर, नवघर पोलिसांनी संबंधित सुरक्षारक्षकाला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : भिवंडीत २१ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल