कल्याण (ठाणे) - कोरोनाच्या पार्शवभूमीवर हॉस्टस्पॉट ठरलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवारा केंद्रात प्रशासनाने केवळ 184 बेघरांना आधार दिला आहे. मात्र आजही कोरोनाच्या सावटाखाली शेकडो बेघर स्त्यावरच गुजारा करीत असल्याचे समोर आले आहे.
कोरोना हॉस्टस्पॉट ठरलेल्या डोंबिवलीतील निवारा केंद्रात केवळ १८४ बेघरांना आधा विशेष म्हणजे या शेकडो बेघर नागरिकांसह निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर गुजारा करणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोरोनाचा धोका कमी होईपर्यत त्यांनाही निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. कोरोनाचे रेड झोन ठरलेल्या कल्याण डोंबिवली शहरात केवळ बेघर नागरिकांसाठी दोनच निवारा केंद्र असून हे दोन्ही केंद्र हॉस्टस्पॉट ठरलेल्या डोंबिवलीतील आहे. यापैकी एका निवारा केंद्रात 80 बेघर तर पाथर्ली येथील केंद्रात 104 बेघरांना ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जनसंर्पक अधिकारी माधवी पोकळे यांनी दिली आहे. मात्र कोरोना आजाराचे रेड झोन ठरलेल्या कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात शेकडो बेघर अजूनही रस्त्यावरच गुजारा करीत असल्याने अशा परिस्थितीत रोजंदारीवर काम करणारी माणसे, नाका कामगार व बांधकाम मजूर यास उदरनिर्वाहाचे काही साधन नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी जैन सोसायटी, रोटरी क्लब, रिलायन्स फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी अन्न वाटप करीत आहेत. तर आजपर्यंत हजारो रेशनिंग किटचे वाटप सर्व प्रभाग क्षेत्रातील नाका कामगार, बांधकाम कामगार, स्थलांतरीत मजूर यांना प्रभागक्षेत्र अधिकारी यांचेमार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हजारो पदपथावरील बेघर, बेवारस तसेच भिकारी यांनाही लॉकडाऊनच्या दिवसापासून आतापर्यंत शिजवलेली हजारो अन्न पॅकेटचे प्रभागक्षेत्र अधिकारी यांचेमार्फत वितरण करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे दरदिवशी प्रत्येक प्रभागात दोन हजाराच्या जवळपास अन्न पॅकेटचे वाटप केली जात असून एकूण 9 प्रभागात सुमारे १० हजारांहून अधिक गरजू व बेघर, भिकारी स्थलांतरीत मजूर, नाका कामगार, बांधकाम कामगार, व बेवारस यांची संचारबंदीच्या काळात गैरसोय होवू नये म्हणून अशाप्रकारे शिजवलेली अन्न पॅकेटचे व रेशनिंग किटचे वितरण महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 10 हॉटस्पॉट्स असून महापालिका हद्दीत आजपर्यत 85 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यातच महापालिका हद्दीत कल्याण, डोंबिवली, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कोपर अशा 6 रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकांपैकी केवळ कल्याण रेल्वे स्थानकासमोरच रस्त्यावर गुजारा करणारे 500 ते 600 बेघर नागरिक दोन्ही वेळच्या अन्न वाटपाच्या रांगेत दिसून येतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोरोनाचा धोका कमी होईपर्यंत या बेघरांनाही कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यानांही निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी कोरोनाच्या पार्शवभूमीवर पुढे आली आहे.