ठाणे - बाजारात एका कोंबडीच्या विक्रीसाठी कुक्कुटपालन व्यावसायिकाला ४५ दिवसांचा कालावधी लागतो. या दिवसात २ ते ३ किलोच्या एका कोंबडीवर साधारणतः १२५ ते १५० रुपये खर्च होतात. मात्र, कोरोना विषाणूच्या धास्तीने खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, १५० रुपयांची कोंबडी ४५ रुपयात म्हणजे १५ रुपये किलोदराने विक्री करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली असून कुक्कुटपालनाचा व्यवसाय अक्षरशः डबघाईला आला आहे.
चीनमधील कोरोना विषाणूचा संसर्ग आणि चिकनबद्दल समाजमाध्यमांवर अफवा पसरवल्याने कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यासह सर्वच तालुक्यातील कुक्कुटपालन व्यावसायिक अवघ्या १५ रुपये किलोच्या दराने कोंबडी विक्री करत आहेत. एकीकडे कोरोना विषाणूची लागण चिकन खाल्ल्याने होत असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा संदेश पाहून बहुतांश खवय्यांनी चिकन खाणे तात्पुरते थांबवले आहे. तर दुसरीकडे सर्दी, खोकला, ताप व शिंका असे कोरोनाच्या विषाणूंची लक्षणे आहेत. सोबतच ढगाळ वातावरणामुळे अनेकांचे घशे खवखवत असून चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूंची लागण होऊन आपण आजारी पडलो तर, असा काहीसा समज नागरिकांमध्ये होत आहे. परिणामी, कुक्कुटपालन व्यवसायांसह मांस विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
हेही वाचा - 'कोरोना' प्रभाव! ८० रुपये किलोचे चिकन डावलून खवय्यांची ६०० रुपये किलोच्या मटणाला पसंती
दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बेरोजगार तरुणांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनाच्या धास्तीने गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बाजारात चिकनची विक्री रोडावल्याने पोल्ट्रीत हजारो कोंबड्या पडून आहेत. त्यामुळे आता बँकेच्या कर्जाचे हफ्ते भरायचे कुठून, असा गंभीर प्रश्न कुक्कुटपालन व्यावसायिकाला पडला आहे.
पशुविकास सहाय्यक अधिकारी डॉ . दिलीप धानके यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले, बिनधास्त कोंबडीच्या मांसावर ताव मारा, कोरोना आणि चिकनचा काहीच संबध नाही. त्याचप्रमाणे, आपल्या देशात कोंबडीचे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खाल्ले जाते. विशेषतः उकळत्या पाण्यात कोणतेच जंतू किंवा विषाणू तग धरू शकत नाहीत. त्यामुळे बिनधास्त चिकनवर ताव मारा, असे डॉ. धानके यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - चिकनचे दर कमी होताच अमरावतीत चिकनच्या दुकानावर खवय्यांची गर्दी