ठाणे - रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण. दरवर्षी या सणानिमित्त बाजारात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु, यावर्षी कोरोनाचे संकट समोर आल्याने बाजारपेठा ओस पडल्या आहेत. परिणामी अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. यावर्षी सर्व देशभरात प्रत्यक्ष राखी बांधण्याचे प्रमाण कमी होणार असून, त्यामुळे या सणावर विरजण पडल्याचे चिन्ह आहे.
श्रावण महिना म्हणजे सण आणि उत्सवांचा महिना. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हे सण साजरे करता येणार नाहीत. कोरोनामुळे रस्ते आणि बाजार ओस पडले असून, लॉकडाऊनमुळे बाजारांमध्ये तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिक ऑनलाईन राखी खरेदी करण्याकडे झुकत असल्याने रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. भावाबहिणीमधील प्रेमाचे अमर प्रतीक म्हणून हा सण साजरा होतो खरा परंतु, लॉकडाऊनमुळे भावाबहिणींना एकत्र येणं अशक्य झाले आहे. त्यामुळे आपल्या भावांना राख्या कुरियरने पाठवणार असल्याचे अनेक ग्राहकांनी बोलून दाखवले. यावर्षी पाच रुपयांपासून सुरु होणाऱ्या राख्यांपासून मोठ्या महागड्या राख्या उपलब्ध असल्यातरी ग्राहकांशिवाय दुकाने ओस पडली होती. लहान मुलांसाठी शिनचॅन, छोटा भीम, लिटिल सिंघम, कृष्णासारख्या अनेक कार्टूनच्या राख्या आल्या आहेत. मात्र, या राख्या आवर्जून घेणारी बच्चे कंपनी घरात बंद असल्याने सणाचा पार बेरंग झाला आहे.
राखीच्या सणाला दरवर्षी नवीन कपडे विक्री , दागिने , शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, मिठाई खरेदी केली जाते. लोक ये-जा करत असल्यामुळे परिवहनला देखील फायदा होत असतो. त्यासोबत रिक्षाचालक अगदी किरकोळ किराणामाल देखील रक्षाबंधनाच्या दिवशी चांगला व्यवसाय करत असतो. मात्र, यावर्षी सोशल डिस्टन्स आणि सरकारच्या निर्बंधांमुळे सर्वच गोष्टींवर परिणाम झाला असून, याची झळ देशभरातील लाखो व्यावसायिकांना सोसावी लागणार आहे.