ठाणे - महापालिका क्षेत्रात ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या ३ महिन्यांचा पगार मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही आपला जीव धोक्यात टाकून कामगार फवारणीचे काम करत आहेत.
दरम्यान, या कामगारांनी गेल्या महिन्यात देखील ठाणे महापालिकेसमोर पगार मिळत नसल्याने आंदोलन केले होते. यावेळी ठाणे महापालिकेच्यावतीने पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू, आजतागायत पगार न मिळाल्याने अखेर कामगारांनी कामबंद आंदोलन केले. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता कामबंद करण्याचा निर्णय योग्य नसला तरी नाईलाजस्तव कामबंद करावे लागत आहे. कारण पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
कामगारांना गेल्या कित्येक महिन्यांपासून मी पगार देत आहे. परंतू, ठाणे महापालिकेने गेल्या ९ महिन्यांचे पैसे दिले नसल्याने कामगारांना पगार देऊ शकत नसल्याचे कंत्राटी कामगारांच्या ठेकेदार शीला पाटणकर यांनी यावेळी सांगितले.