ठाणे - बदलापूर वांगणी रस्त्यावर असलेल्या डोणे ग्रापंपचायत हद्दीतील ओढ्याच्या पाण्यात कोंबडी विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक मेलेल्या कोंबड्या टाकत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा तुटवडा, दोन वर्षातील उच्चांकी दर
अंबरनाथ तालुक्यातील डोणे ग्रामपंचायतच्या हद्दीतून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी उल्हासनदी जाऊन मिळते. तसेच हेच पाणी शेतीसाठी आणि गावकरी पिण्यासाठी वापरतात. मात्र, अनेक दिवसांपासून या पाण्यात कोंबडी विक्रेते आणि काही हॉटेल व्यावसायिक राजरोसपणे मेलेल्या कोंबड्या आणि त्याची पिसे या ओढ्याच्या पाण्यात टाकत आहेत. त्यामुळे या ओढ्यात अक्षरशः या मेलेल्या कोंबड्यांचा खच पडला असून त्या कुजल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
हेही वाचा - मानवी साखळीनंतर मनसेचे टोलमुक्तीसाठी धरणे आंदोलन
डोणे ग्रामपंचायत हद्दीतून वाहणाऱ्या या ओढ्याचे पाणी उल्हासनदीत जाते आणि या पाण्यावर अनेक गावांचा पाणी पुरवठा प्रकल्प आहे. तसेच आदिवासी बांधव पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. त्यामुळे नागिरकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार डोणे ग्रामपंचायत आणि ग्रामसेविकांकडे तक्रार केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.