ठाणे - कोईम्बतूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. मध्यरेल्वेच्या अंबरनाथ-बदलापूर लोहमार्गावर आज दुपारच्या सुमाराला बेलवली गेट नजीक ही घटना घडली.
एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण - कर्जत लोकल वाहतुकीवर परिमाण होऊन अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान एकामागे एक लोकलच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे यातील प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळावरून पायी चालत इच्छित रेल्वे स्थानक गाठावे लागल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले.
दरम्यान, तासाभरानंतर इंजिनमधील बिघाड दुरुस्ती करून ३ वाजून ४५ मिनिटाने एक्स्प्रेस पुढील ठिकाणी मार्गस्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या बिघाडामुळे लोकलची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिरा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.