ठाणे - रेशन दुकानातील धान्य परस्पर विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शिधावाटप दुकानदाराचा उल्हासनगरातील दक्ष नागरिकाने भांडाफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरात नवल छाब्रिया याचे शासकीय शिधा वाटपाचे दुकान आहे. या दुकानातून शनिवारी दुपारच्या सुमारास पीठ गिरणी चालक गुप्ता हा 2 गव्हाच्या गोण्या सायकलवर घेऊन जात होता. त्यावेळी दक्ष नागरिकाने त्याला हटकले असता, या गव्हाच्या गोण्या छाब्रिया यांच्या शिधा दुकानातून 18 रुपये किलोने खरेदी केल्याचे सांगितले.
हेही वाचा - नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० : प्रभाग रचनेचे प्रारूप आणि आरक्षणाची सोडत जाहीर
वास्तविक शिधा दुकानात गरिबांना 2 रुपये किलो दराने गहू मिळतो. मात्र, दुकानदार छाब्रिया हा गरिबांच्या तोंडचा घास हिरावून चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दक्ष नागरिकाने ही गंभीर बाब उल्हानगर शिधा अधिकारी सानप यांच्याशी संपर्क करून लक्षात आणून देत, थेट शिधा अधिकारी कार्यलयात गव्हाच्या गोण्या जमा केल्या. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दुकानदारावर कारवाईची त्यांनी मागणी केली.
हेही वाचा - "मनुवादी जातीव्यवस्थेने अधिकार नाकारलेल्या लोकांनी नागरिकत्वाचे पुरावे द्यायचे कोठून"
दुसरीकडे शासकीय शिधा दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणालीने धान्य वितरण व्यवस्था करीत दुकानदारांचे कमिशन दुपटीने वाढविले. तरी देखील उल्हासनगर शहरातील बहुतांश शिधा वाटप दुकानदारांकडून रेशनच्या धान्याचा गोरखधंदा सुरु असल्याचे दिसत आहे. या धान्याची काळ्या बाजारात विक्री सुरूच असल्याने शासनाने रेशन विक्री ऑनलाईन केली असली तरी धान्याचा काळा बाजार थांबलेली नाही, असे दिसत आहे.
दरम्यान, शिधा अधिकारी सानप यांच्याशी संपर्क साधला असता रेशनचा काळा बाजार करणारे दुकानदार छाब्रिया यांच्या दुकानात असलेल्या शिधाची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.