ठाणे - येत्या रविवारी २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही भागातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
कुरुक्षेत्रावरून कंकणाकृती दर्शन -
खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच ‘कंकणाकृती ‘ अवस्था म्हणतात. तशी कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. विशेष म्हणजे जिथे महाभारत युद्ध झाले त्या हरियाणामधील कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. २१ जूनला सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. कुरुक्षेत्र हे महान तीर्थक्षेत्र असल्याने तेथील ब्रह्मासरोवरावर तीर्थस्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा राज्य सरकारला तेथे विशेष खबरदारी घ्यावी लागेल, असेही सोमण म्हणाले.
मुंबईतून खंडग्रास दर्शन -
मुंबईतून रविवार सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतु, मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल, अशी आशा खगोलप्रेमींना वाटत आहे, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
पुणे येथून सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी ते दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, नाशिक येथून सकाळी १० वाजून ०४ मिनिटांनी ते दुपारी १ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, नागपूर येथून सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, औरंगाबाद येथून सकाळी १० वाजून ०७ मिनिटांनी ते दुपारी १ वाजून ३७ मिनिटांपर्यंत यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल.
सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचाच वापर करावा. फोटो काढताना किंवा दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व युरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया येथून दिसेल.
यापूर्वी २६ डिसेंबर २०१९ ला झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ ला येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशिरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ ला येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.