ठाणे : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. यामध्ये नाल्यांची पाहणी करण्यासोबतच त्यांनी रस्त्यांच्या कामांची देखील पाहणी केली. यावेळी ठाण्यातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. 'बरेच दिवस झाले तरी कामे पूर्ण का होत नाहीत? वेळ देऊन सुद्धा कामे पूर्ण होत नाहीत. दोषी कोणीही असो त्यांच्यावर कारवाई करा', अशा शब्दात आज एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल, मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या परिसरातून नागरिकांच्या समस्या समोर येतील त्यांच्यावर मात्र निश्चित कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
'रस्त्यांच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल' : पोखरण रोड क्र. 2 च्या रखडलेल्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. वर्क ऑर्डर देऊनही रस्त्यांचे काम वेळेत न झाल्याने मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर संतापले होते. केवळ ठाणे महापालिका क्षेत्रात 134 किमीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आयआयटीला देखील रस्त्यांचे सॅम्पल पाठवले जातील. रस्त्यांच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट देखील केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विकासकामांसाठी 600 कोटींचा निधी : ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्त्यावर खड्डा पडल्यास एका खड्ड्याला एक लाख दंड वसूल करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र खड्डा पडेल अशी वेळच अधिकाऱ्यांनी आणू नये, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना झाला नाही पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांच्या परिसरात समस्या होणार नाही, अशा अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. मात्र नागरिकांना त्रास झाला तर कारवाई निश्चित केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. विकासकामांसाठी राज्य शासनाकडून 600 कोटी दिला आहे. या निधीमधून शहरात चांगली कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
75 हजार जागांची भरती करणार : शासन 75 हजार रिक्त जागांची भरती करणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून देखील स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जलशिवार योजनेला चालना देणार : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात जलशिवार योजना सुरु झाली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात ही योजना बंद झाली. मात्र आता ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हे सरकार गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे शहरातील नाल्यांची आणि रस्त्यांची कामे बघायला मी स्वत: आलो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :