ठाणे - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अजूनही काही नागरिकांना कोरोनाबाबत गांभीर्य कळाले नसल्याने अखेर संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १७ बेजबाबदार नागरिकांवर बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गर्दी टाळल्यास प्रसार रोखणे शक्य असल्याने राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरी देखील काही टवाळखोर आणि बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.
त्यामुळे पोलिसांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून अशा नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी फटकेही दिले. तरी देखील काही नागरिक आजही संचारबंदीचा कायदा पायदळी तुडवून राजरोसपणे रस्त्यावर फिरत आहेत. अखेर १७ जणांविरोधात संचारबंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.