ठाणे - संशयातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्वप्नील उर्फ बाबू हनुमान जाधव (25) असे आरोपीचे नाव आहे. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.
मुंब्रा येथे राहणारा आणि लिफ्ट मॅकनिकल स्वप्नील याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीशी 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. दरम्यान, तिला अनोळखी व्यक्तीचे फोन येऊ लागल्याने याची माहिती तिने प्रियकर स्वप्नील याला दिली होती. त्यामुळे तो तिच्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. या भांडणातून स्वप्नील याने तिला एकटीला भेटण्यास बोलवले. यानंतर तिच्यावर वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - अमूलची सोशल मीडियावरून बदनामी; आरोपीने 'ही' मागणी करताच गुन्हा दाखल
हत्येच्या काही महिन्यांपूर्वी त्याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली होती. त्यानंतर, त्याने तिचा त्यावेळी गर्भपात करून घेतला होता. याप्रकरणी, तिच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नील याच्या विरोधात हत्या आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केली होती. हा खटला अंतिम सुनावणीसाठी न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयासमोर आल्यावर सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेले पुरावे, युक्तीवाद आणि 12 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून स्वप्नील याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
हेही वाचा - शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..
यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच 20 हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. तर दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त कैदेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच अत्याचार प्रकरणी त्याला 10 वर्ष कारावास आणि 10 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.