ठाणे - रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना हाताने आणि चाकूने वार करून एका तरुणाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज (मंगळवारी) सकाळी तरुणाचे धड आणि मुंडके रेल्वे रुळावर आढळून आले आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कल्याण -डोंबिवली शहराला जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर ९० फुटी रोडवर घडली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बेचन प्रसाद चौहान (32, रा .त्रिमूर्ती नगर, डोंबिवली) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर बबलू चौहान (35) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
गावी जाण्यासाठी निघाले असता घडला प्रकार
डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचेन आणि बबलू चव्हाण हे एका भाड्याच्या खोलीत राहून मृतक बेचन हा पेंटिंगचे काम करत होता. तर जखमी बबलू हा सुतार काम करत आहे. हे दोघे उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल रात्री 1:20 च्या ट्रेनने एका रिक्षातून ठाकुर्ली समांतर रस्त्याने कल्याण रेल्वे स्थानकात जात होते. त्याचवेळी तीन अनोळखी तरुणांनी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास मारहाण करून पळून लावले. त्यानंतर बेचेन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे रुळावर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने अनोखळी आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र बेचेन हा त्यांच्या तावडीत सापडला. अखेर जखमी बबलूने ही माहिती मध्यरात्री त्याच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. माहिती आज सकाळी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता बेचेन चौहानचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. त्याचे धड आणि मुंडके हे वेगळे झालेले पोलीसांना सापडले.
हत्या की रेल्वे अपघातात मृत्यू ? तपास सुरु
बेचैनचा मृत्यू चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचा आरोप जखमी बबलू याने पोलीसांशी बोलताना केला आहे. तर ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू ? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस घेऊन तपास करीत आहेत. दुसरीकडे कल्याण डोंबिवली शहराला जोडणाऱ्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास गर्दुल्ले वावरत असतात. या रोडवरील चोरी आणि लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून येथील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची, गर्दुल्ल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा - अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवा आणि मिळवा 5000 रुपये; केंद्र सरकारची नवी योजना