ठाणे - एकीकडे कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र ठाण्यात भाजपच्या वतीने आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात त्यालाच तिलांजली दिल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी महिला मोर्चाचा कार्यकारिणी पदनियुक्ती आणि शहरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ खोपट येथील भाजप कार्यालयात झाला. यावेळी काही जणांनी मास्क घातले नव्हते तर, सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाला.
कोरोनाचा विसर
कोरोना काळात स्वतःची काळजी घेण्यापासून सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र असे असताना ठाण्यातील भाजपच्या ओबीसी महिला मोर्चा कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्व नियम धाब्यावर बसवून भाजप कार्यकर्ते वावरत होते. कार्यक्रमात गर्दी झाली असून मास्कचा वापर करावा आणि गर्दी कमी करावी, असे आवाहन ओबीसी सेलच्या महाराष्ट्र अध्यक्ष वनिता लोंढे यांनी केले होते. तरी देखील कार्यकर्त्यांनी याला गांभीर्याने प्रतिसाद दिला नाही.