ठाणे - खंडणी मागीतल्याच्या गुन्ह्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण पवार हे फरार होते. विकासकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नारायण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अटकपूर्व जामिनाच्या जोरावर नारायण पवार यांना अटक होत नव्हती.
गेल्या आठवड्यात नारायण पवार यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुवावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ठाणे नगरपालिका भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून नारायण पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शेवटी आज ठाणे पोलिसांच्या कासारवडवली पोलिसांनी नारायण पवार यांना अटक करुन ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना ठाणे न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नारायण पवार राजकरणाचे बळी
दाखल केलेला गुन्हा हा दबावपोटी करण्यात आल्याचे नारायण पवार यांनी सांगितले होते. पालिका प्रशासनाचा भोंगळ कार्यभार उघड केल्यामुळे त्यांचे आणि पालिका प्रशासनात खटके उडत होते. याच राजकारणातून हा सुड उगावन्यसाठी गुन्हा दाखल झाल्याचे पवार यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
नागरिकांचा आजही पाठिंबा
नारायण पवार हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये येऊन पुन्हा एकदा नगरसेवक झाले आहेत. त्याआधी ४ वेळा ते काँग्रेसमधून नगरसेवक झाले होते. एकदा त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. त्यांना आजही त्यांच्या प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा असल्याचे नागरिक सांगत आहेत. आमच्या सुख दुखांमध्ये नेहमी नारायण पवार सहभागी असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.