ठाणे - कल्याण-मुरबाड महामार्गावर कार आणि अज्ञात बोलेरो पिकअप जीपची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करीत असलेले उल्हासनगर महापालिकेतील भाजपा नगरसेवक अजित गुप्ता (Corporator Ajit Gupta) हे जागीच ठार झाले. तर त्याच्या मित्र शिवशंकर दत्ता यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा अपघात कि घातपात ? अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे कल्याण तालुका पोलिसांनी या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरसेवकाचा जागीच मृत्यू -
मृतक अजित उर्फ पप्पू गुप्ता हे त्यांचा मित्र शिवकुमार दत्ता याच्याबरोबर मुरबाडवरून उल्हासनगरच्या दिशेने शुक्रवारी रात्रीच्या साडे अकराच्या सुमारास त्यांच्या कारने येत होते. त्यावेळी कांबागाव येथील पाचवा मैल रस्त्यावरून मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप जीपने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या भीषण अपघातात नगरसेवक अजित गुप्ता आणि त्याचा मित्र हे दोघे कारमध्ये जखमी अवस्थेत पडून होते. अपघाताची माहिती नगरसेवक अजित गुप्ता यांचे भाऊ धर्मेंद्र यांनी मित्रांसह धाव घेतील. अजित आणि शिवकुमार यांना कारमधून गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत उल्हासनगरच्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. मात्र मेंदूमध्ये गंभीर दुखापत आणि हृदयाचा झटका आल्याने नगरसेवक अजित उर्फ पप्पू गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या बोलेरो पिकअप जीपने कारला धडक दिली. त्या जीपही चालक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तर मृतक नगरसेवक यांच्या सोबत कारमध्ये असलेला शिवकुमार दत्ता यांचा डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर संकेत सातपुते, संदेश रसाळ यांनाही जखमी अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगरसेवक अजित गुप्ता आणि शिवकुमार दत्ता यांच्यावर उल्हासनगर कॅम्प 3 मधील शांतीनगर येथील स्मशानभूमीत शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अज्ञात प्रवासी जीप चालकाचा शोध सुरु -
याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात प्रवासी जीप चालकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कमलाकर मुंडे यांनी दिली आहे. तर मृतक नगरसेवक अजित यांचे वडील प्रभुनाथ गुप्ता, आई आशा गुप्ता, वहिनी अनिता गुप्ता असे यापूर्वीही घरातील ३ नगरसेवक म्हणून निवडणून आले होते. तर 2017 च्या निवडणुकीत अजित गुप्ता हे भाजपा पक्षाकडून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम, 10 वर्षीय मुलगा व 5 वर्षीय मुलगी आहे. मात्र आगामी होणाऱ्या महापालिका निवडणूक पाहता, शहरात सर्वच राजकीय पक्षात गेल्या दोन महिन्यापासून वातावरण चांगले तापले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अपघात कि घातपात अशी चर्चा शहरात सुरु असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - Gadchiroli Naxal Encounters : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकींचा आढावा