ठाणे : सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या तसेच अभिनेता सलमान खान यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पंजाबमधील लॉरेंस बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. बिश्नोई गॅंगने खंडणीसाठी अंबरनाथमधील एका ज्वेलर्स दुकान मालकाच्या मुलीचे अपहरण करून तुझी हत्या करण्यात येणार असल्याची मोबाईलवर धमकी दिली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स दुकानाचे मालक परबतसिंग किशोरसिंग चुडवाल (वय 48) यांनी अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
कॉलद्वारे खंडणीची धमकी : मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार परबतसिंग चुडवाल यांचे अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर मध्ये देवभैरव ज्वेलर्स नावाने सोने चांदीचे दागिणे विक्रीचे दुकान आहे. त्यातच तक्रारदार परबतसिंग यांना 23 मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईल नंबरवर कस्टमर केअर मधून कॉल आला होता. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने लॉरेंस बिश्नोई गँगकडून बोलत असल्याचे सांगण्यात आले. आणि मी पाठवत असलेल्या बारकोड नंबरवर 20 हजार रुपये पाठव, नाही तर तुझ्या मुलीचे अपहरण करू, अशी धमकी देण्यात आली. या कॉलद्वारे सांगण्यात आले की, अपहरण केल्यानंतर तुला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुला तुझे कुटूंबाशी प्रेम आहे की फक्त पैशावर प्रेम आहे. असे बोलून त्या अज्ञात व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत होता. शिवाय जर तू आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुझी हत्या करू, अशीही धमकी दिली.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : तक्रारदार परबतसिंग हे भयभीत या धमकीमुळे झाले होते. विशेष म्हणजे त्या अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्यानंतर किमान 15 वेळा परबतसिंग यांच्या मोबाईलवर कॉल केले होते. मात्र, भयभीत झाल्याने त्यांनी कॉल रिसिव्ह केले नाही. त्यानंतर मात्र जो बारकोड अज्ञात आरोपीने पाठवला त्याचे स्कँन केल्यानंतर मोबाईल नंबर समोर आला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सदरचे मोबाईल नंबर व बारकोड सायबर विभागाकडे तपासासाठी पाठवले. त्यानंतर ज्वेलर्स दुकानाचे मालक परबतसिंग किशोरसिंग चुडवाल यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 385,506(2), 504, 507 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंवर करीत आहेत.
हेही वाचा : Nagpur Crime: अनैतिक संबंधांनी घेतला दोन महिलांचा जीव; दोघांना अटक