ठाणे - राज्य शासनाने शाळा उघडण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीणमध्येही शिक्षणांची दारे विद्यार्थ्यासाठी दोनच दिवसापूर्वी उघडण्यात आले. त्यामुळे दीड वर्षानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावर्णे गावातील जिल्हा परिषद शाळेवर वीज कोसळल्याने लाखोंचे शालेय साहित्य जळून खाक झाले आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
हवामान खात्याने गेल्या दोन दिवसापूर्वीच राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाचे संकेत दिले. त्यातच मुरबाड तालुक्यातही काल रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील सावर्णे परिसरात अचानक विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने सुरुवात झाली. त्यामुळे अचानक गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेवर वीज कोसळली.
दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान
या दुर्घटनेत शाळेच्या भिंतीना तडे गेले असुन शाळेतील संगणक, प्रिंटर, प्रोजेक्ट, लाइटची वायरींग जळुन खाक झाली आहे. तर विजेच्या धक्क्याने शाळेवरील पत्र्यांना सुद्धा तडे गेले असुन खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. शिवाय शाळेचे महत्वाचे कागदपत्रेही जळुन खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांसह शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज पडल्याने झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. या दुर्घटनेत साधारण दोन ते अडीच लाख रुपयांचे शाळेचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा - एनसीबीची कारवाई : पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला घेतले ताब्यात