ठाणे - भिवंडी तालुक्यातील कवाड येथे संत सखाराम महाराज जयंतीनिमित्त यात्रा भरली होती. या यात्रेने १२५ वर्षांपासून कुस्तीच्या स्पर्धेची परंपरा टिकवून ठेवली आहे. या कुस्तीच्या फडात नामवंत मल्ल सहभागी झाले होते.
भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश गुरव यांच्या पुढाकाराने यावर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुस्ती स्पर्धेमध्ये भिवंडी, कल्याणसह ठाणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धुळे आदी ठिकाणच्या सुमारे १०० कुस्ती पहिलवानांनी सहभाग घेऊन आपल्या कुस्ती खेळाची चमक दाखवली.
या कुस्ती स्पर्धेला १२५ वर्षांपासूनची परंपरा असून ती ग्रामस्थांनी आजही कायम टिकवून ठेवली आहे. विशेष म्हणजे महिला पहिलवानांनी देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कला सादर केली. या कुस्ती स्पर्धेत विजयी पहिलवानांना भरीव रोख रकमेसह आकर्षक वस्तूंची बक्षिसे देण्यात आली. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.