ठाणे - टोलनाक्यावर वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाहनचालकांना बसणारा इंधनाचा आर्थिक फटका यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यावर वाहनांवर फास्टॅग लावण्याचा आदेश दिला आहे. या नियमांचे वाहनचालकाने पालन केले नसल्यास त्यांच्याकडून टोल नाक्यावर दुप्पट रकमेचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघात येणाऱ्या कोन आणि पडघा टोलनाक्याच्या रस्त्याची अवस्था बिकट असून आधी रस्ते सुधारा, नंतरच काय ते फास्टॅग लावा, असा टोला शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केंद्र सरकारला लगावला.
भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर आमदार शांताराम मोरे हे केंद्र सरकारच्या फास्टॅग योजनेबाबत त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकारांना मुलाखत देण्यासाठी आले होते. दरम्यान, आमदार मोरे हे पत्रकारांना माहिती देत असतानाच, टोलनाक्याच्या ५० ते ७० फूट अंतरावर त्यांच्याच पाठीमागे या टोलनाक्याच्या मार्गावर पेव्हरब्लॉकचे पॅच लावल्याने तरुणीची दुचाकी घसरून ती रस्त्यावरच खाली पडून अपघात झाला. त्यात दुचाकीच्या अपघाताचा आवाज आल्याने आमदार मोरे आणि त्यांचे अंगरक्षक पोलीस, पीए यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीच्या दिशेने येणारी भरधाव वाहने थांबवल्याने तिचे प्राण वाचले. त्यानंतर या अपघाताची घटना पाहून आमदार मोरे यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध रखडेल्या कामांचा पाढाच पत्रकारांसमोर वाचला.