ठाणे - पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित रायझिंग डे सप्ताहानिमित्त भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रातील 71 तक्रारदारांचा तब्बल 1 कोटी 13 लाख 72 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी नागरिकांनी ज्या विश्वासाने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीस दलाने त्याचा कसून तपास करून तो मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करीत असल्याने त्याचा आनंद संबंधित तक्रारदारांसोबतच पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपणास असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमादरम्यान भोईवाडा, निजामपुरा, शहर, नारपोली, शांतीनगर, कोनगाव या 6 पोलीस ठाण्यातील एकूण 71 गुन्ह्यांसोबत 'प्रॉपर्टी मिसिंग' प्रकरणातील 10 लाख 61 हजार 820 किंमतीचे सोन्याचे दागिने, 7 लाख 44 हजार 500 रुपये किमतीची वाहने, 42 लाख 28 हजार 247 रुपये किमतींचे मोबाईल, 48 लाख 25 हजार 773 रुपये किमतींचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांब्याची कॉईल मेडिकल पावडर व रोख रक्कम 5 लाख 11 हजार 850 रुपये, असा एकूण 1 कोटी 11 लाख 72 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार नागरीकांना सुपूर्द केला.
हेही वाचा - ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक
कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर कष्टाने बनविलेले अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्यानंतर आम्ही गलितगात्र झालो होतो. परंतु पोलिसांनी ज्या शिताफीने चोरांना पकडून आमचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत झाल्याचा फोन पोलिसांकडून आल्यानंतर आमचा विश्वासच बसला नाही. परंतु आज आमचे लाख मोलाची मिळकत हाती आल्याने हा क्षण आमच्यासाठी आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया अजय शितोळे यांनी दिली. तर ऐन निवडणुकीतील मतमोजणीच्या धामधुमीत कुटुंबीयांसह बाहेर गेलो असताना भरदिवसा घरफोडीत 34 तोळे सोने व 5 लाख रोख रक्कम चोरीला गेली असता ती अवघ्या 14 दिवसात चोरांना पकडून हस्तगत करून देत आपला मुद्देमाल आज परत मिळाल्याने पोलिसांबद्दल समाजात चांगला संदेश जाण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया निजामपुरा येथील इशराक अहमद मिर्झा यांनी दिली.
हेही वाचा - ठाण्यात रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन; धान्याचा अपहार होत असल्याचा आरोप
यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर, किसन गावित यांसह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.