ठाणे - राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भिवंडीत खासगी रूपाने वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीशी आर्थिक साठगाठ करून एका रात्रीत परिपत्रककडून भिवंडीत वीज ग्राहकांना जोरका झटका दिला. विशेष म्हणजे चुकीची वीज देयके आल्याने त्यामध्ये दुरुस्ती न करताच अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा काल रात्रीपासून खंडित करीत असल्याचा आरोप भिवंडी शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला आहे. आता ऊर्जा मंत्र्यांवरील आरोपामुळे उद्या होणाऱ्या भाजपच्या टोरेंट पॉवर कंपनीच्या विरोधात वीजबिलाच्या होळी आंदोलनात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लॉकडाऊन काळातील वीजबिले पाठवताना टोरेंट पॉवर कंपनीने भिवंडीतील लाखो वीज गिऱ्हाईकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून नागरिकांमध्ये गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या शेट्टींनी केला आहे. विशेष म्हणजे सरासरीच्या नावाखाली भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने, कार्यालये बंद होती, तरी भिवंडीतील छोट्या व्यापाऱ्यांनाही लाखा-लाखांची बिले पाठवण्यात आली. व्यवसाय बंद असताना लहान-सहान व्यावसायिकांनी बिले भरायची तरी कशी? हा विचार महाविकास आघाडी सरकारने केला नाही. तेवढी संवेदनशीलताच या सरकारकडे नाही. त्यामुळे भिवंडीतून टोरेंट पॉवर कंपनीसह महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच भगाव आंदोलन उद्या होणार असल्याचेही संतोष शेट्टी यांनी सांगितले.