ठाणे : डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला चक्क गुजराती भाषेतून ( Aadhar Card ) आधार कार्ड मिळाले आहे. या आधारकार्डवर `मारो आधार मारो पहचान` असे गुजराती भाषेत लिहले ( Aadhaar card in Gujarati language ) आहे. नेमके कोणाच्या चुकीने हे आधार कार्ड बनवण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. एकीकडे सीमा वादाचा प्रश्न निर्माण होत असतांना गुजराती आधार कार्ड मिळणे मुंबई गुजरातला ( Aadhaar card in Gujarati language ) जोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे यांनी यावेळी केला.
गुजराती भाषेत आधारकार्ड - डोंबिवली पश्चिमेला खंडेराय इमारतीत बाबूशा दगडू खंडागळे ( 72) राहतात. खंडागळे यांच्याकडे आधारकार्ड होते. खंडागळे यांनी डोंबिवलीतून आधारकार्ड बनवून घेतले होते. मात्र त्यांच्या आधारकार्डमध्ये फक्त जन्म तारखेचा उल्लेख नसून फक्त जन्म वर्षाचा उल्लेख होता. खंडागळे यांनी पुन्हा डोंबिवली पश्चिमेकडील एका आधार कार्ड केंद्रातून आपलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अर्ज केला. खंडागळे यांचे स्मार्ट आधार कार्ड आले. मात्र, आपले आधार कार्ड पाहून खंडागळे नाराज झाले. महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेतून नव्हे तर, चक्क गुजराती भाषेतून आधारकार्ड आले. खंडागळे यांनी आपल्या मित्राला याची माहिती दिली.
महाराष्ट्राचा अपमान - याबाबत शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे म्हणाले, खंडागळे हे गेल्या ३० वर्षापासून राहतात.`मारो आधार मारो पहचान` असे आधारकार्डमध्ये लिहिले आहे. हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जाणूनबुजून हा प्रकार आहे. यावर आम्ही आंदोलन तर करूच आणि याचा जाहीर निषेधही करतो. अशाप्रकारे महाराष्ट्रातील आधार कार्ड गुजराती भाषेतून आल्याने मुंबई गुजरात राज्याला जोडण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचे हे उदाहरण आहे. ज्येष्ठ नागरिक खंडागळे म्हणाले, मला वाचताच येत नव्हते. मी हे आधार कार्ड दुसऱ्याकडे वाचून घेतले. हे आधारकार्ड गुजराती भाषेतून बनवून आले असल्याने आता आम्ही काय गुजरातला राहायला जायचे का ?