ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी मिलिंद जाधव यांनी "घरातुनी आणि दारातुनी कोणी बाहेर नका हो पडू, भीम जयंती, भीम जयंती घराघरात साजरी करू" अशी कविता सादर करत सामाजिक संदेश देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी केली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. असे असताना सरकारी नियमाचे पालन करून आज जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी घरीच भिम जयंती साजरी केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून युवा कवी मिलिंद जाधव यांनी घरातच आपल्या परिवारासोबत जयंती साजरी केली आहे.
भीम जयंती आणि कोरोना अशा आशयाची कविता सादर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा केंद्रांवर पंचवीस गावे मिळून मोठ्या उत्साहात संयुक्त जयंती साजरी केली जाते. परंतु सध्या कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या राज्यात संचारबंदी काळात आपण सरकारच्या आदेशाचे पालन करत पडघा विभातील नागरिकांनी घरोघरीच आपल्या परिवारासोबत महामानवांची आपल्या परिवाराला माहीत देत महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती वैचारिक पद्धतीने साजरी करून यांना आदरांजली दिली, अशी प्रतिक्रिया युवा कवी मिलिंद जाधव यांनी दिली.