ठाणे - औरंगाबादच्या नामकरणावरून सध्या राज्यात राजकीय कुरघोडीचे राजकारण तापले असतानाच, या वादात आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उडी घेतली आहे. नाव बदलायचे आहे तर रायगडाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे व महाराष्ट्राचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र’ करावे अशी मागणी आझमी यांनी केली आहे. दरम्यान आझमी यांनी केलेल्या या वक्तव्याचा संदर्भ देऊन, भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वार्थासाठी या तीन पक्षांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केल्याची टीका त्यांनी केली.
नामकरणाच्या वादात भाजपची उडी
औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे ही मागणी गेल्या तीन दशकांपासून केली जात आहे. मात्र गेल्या तीन दशकात हे नाव बदलण्यात आलेले नाही. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा शिवसेनेने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी तयारी दर्शिवली आहे. त्याला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र, आघाडीमधील काँग्रेसने नाव बदलण्यास विरोध दर्शवला आहे. नाव बदलून विकास होत नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. दरम्यान भाजपचं सरकार महाराष्ट्रात आल्यास दुसऱ्याच दिवशी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करू असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केल्याने, आता या वादात भाजपने देखील उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पाटलांची आझमींवर टीका
नाव बदलायचे आहे तर रायगडाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे व महाराष्ट्राचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र’ करावे अशी मागणी आझमी यांनी केली आहे. यावरून भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी अबू आझमींवर निशाणा साधला. आम्ही आझमींच्या प्रस्तावाचे स्वागत केले असते, मात्र त्यांचा हेतू शुद्ध नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे.