ठाणे - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष निवडणुकीला सज्ज झाले आहेत. 2014 च्या निवडणुकीत हार पत्करलेल्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असून कळवा-मुंब्रा गड महायुती काबीज करणार, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाण्यात केले. तसेच 'अबकी बार 220 पार' असे मत भातखळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे-कोकण विभागाच्या 'मीडिया सेंटर' चे उद्घाटन भातखळकर यांच्या हस्ते भाजप कार्यालयात करण्यात आले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी दोन हात करून ही जागा आपल्या ताब्यात कशी येईल याची रणनीती आखली आहे.
दरम्यान, एकीकडे युतीच्या जागावाटपाचा तिढा असून सुटलेला नसून युतीवर येत्या दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल, असे विधान देखील अतुल भातखळकर यांनी ठाण्यात केले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत काय दिवे लावले आणि खोटे व्हिडिओ लावून जनतेचा भ्रम होणार नाही. जनता ही विकासाच्या मुद्द्यावर अनुभवत आहे. त्यामुळे अशा अपप्रचाराला जनता बळी पडत नाही, असा टोला राज ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा- निवडणूक निकालानंतर आम्हीच फटाके फोडणार - जयंत पाटील
ठाणे, कोकण विभागात एकूण 39 विधानसभा मतदारसंघ असून सर्व जागावर आमचा विजय निश्चित आहे. गेल्या 5 वर्षात युती सरकारने केलेल्या विकासकामांवर मतदार आम्हाला निवडून देतील, असा विश्वास भाजपचे अतुल भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, गटनेते नारायण पवार यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
हेही वाचा- टीका करणे विरोधकांना शोभते सत्ताधाऱ्यांना नाही; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला