ठाणे - पत्नीला ठार मारण्याच्या प्रयत्नात दोषी आढळलेल्या, भिवंडी शहरातील एका वकिलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावणी आहे. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी गुरुवारी भादवि कलम 307 अन्वये या वकिलाला सक्तमजुरीची शिक्षा सुनावणी, तसेच त्याला 5 लाखांचा दड देखील ठोठावण्यात आला आहे. अहमद आसिफ पक्की असे या वकिलाचे नाव आहे.
ऑक्टोबर 2001 मध्ये झाला होता निकाह
न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपी वकिलाने ऑक्टोबर 2001 मध्ये पीडित महिलेशी निकाह केला होता. त्यांना तीन मुले असून, आरोपी हा पीडित पत्नीला वारंवार मारहाण करत होता, पतीच्या त्रासाला कंटाळून पीडिता आपल्या तीन मुलांसह पतीपासून वेगळी राहत होती. त्यानंतर काही दिवसांनी पत्नीने न्यायालयात घटस्फोटाचा दावा देखील दाखल केला होता.
कार्यालयातच पत्नीवर प्राणघातक हल्ला
11 फेब्रुवारी 2010 रोजी पीडित पत्नी तिच्या वकिलासह आरोपी वकिलाच्या कार्यालयात गेली होती. यासीम मोमीन हे आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते, तर प्रणव फडके हे पीडित महिलेचे वकील म्हणून काम पाहत होते, दरम्यान घटनेवेळी हे दोन्ही वकील आरोपी पतीच्या कार्यालयात हजर होते. दरम्यान या वकिलांसोमोरच आरोपी पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, सुरुवातीला त्याने पत्नीवर गोळीबार केला. मात्र त्यातून पत्नी वाचल्याने त्याने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तिची कार घेऊन घटनास्थळाहून आरोपीने पळ काढला होता. तर या दोन्ही वकिलांनी गंभीर जखमी अवस्थेत पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी न्यायालयात गैरहजर
दरम्यान शिक्षा सुनावणीच्या वेळी आरोपी न्यायालयात हजर नव्हता. त्यामुळे न्यायाधीशांनी शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे पोलीस आयुक्तांमार्फत आरोपीविरोधात अजामीनपात्र व दोषी वारंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. तर विशेष सरकारी वकील श्रीमती हेमलता देशमुख यांनी सांगितले की, न्यायाधीशांनी आरोपीला दहा वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षेसह पाच लाखाचा दंड ठोठावला असून, त्या पाच लाखांपैकी चार लाख रुपये हे पीडितेला देण्यात येणार आहेत.