ठाणे (मिरा भाईंदर): पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन इसम तोंडाला माक्स ज्वेलर्स दुकानात शिरले. यानंतर त्यांनी दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्वेलर्स मालकाने जीव धोक्यात घालून त्यांच्याशी मुकाबला केला आणि लुटारूंना पळवून लावले. ठाणे शहरात महिन्याभरात दुसरी घटना घडल्याने सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
असा घडला घटनाक्रम: कोठारी ज्वेलर्समध्ये दुपारी चारच्या सुमारास दोन अनोळखी इसम सोन्याची अंगठी विकत घ्यायची आहे, असे सांगून ज्वेलर्स मालकाशी चर्चा करू लागले. यावेळी ज्वेलर्स मोहित कोठारी यांना संशय आला आणि त्यांनी ज्वेलर्सच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या दोन इसमांनी बंदूक दाखवून सोने लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहित यांनी आपल्या दुकानात असलेली लोखंडी काठी हातात घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या सोबत एकहाती मुकाबला केला आणि दरोडेखोरांना पळवून लावले. या दरोडेखोरांना सोने नाही पण मोबाईल चोरण्यात यश आले. दरोडेखोरांना दुकान मालकाने पळवून लावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलिसांकडून पाहणी: पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. काशिमिरा गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त जयंत बजबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ अशी त्यांनी माहिती दिली आहे.
यापूर्वीही घडल्या लुटीच्या घटना: ६ मे रोजी भाईंदर पश्चिमेच्या ६० फुटी रोड लगत असलेल्या शक्ती ज्वेलर्समध्ये दुपारी लुटमारीची घटना घडली होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत केला. मात्र, नागरिकांनी त्याला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर महिन्याभरातच ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा: