ठाणे - जिल्ह्यासह मुबंई, नाशिक येथील पर्यटकांची शहापुर तालुक्यातील प्रसिद्ध अशोक धबधब्याला सर्वाधिक पसंती आहे. हा धबधबा दुर्गम आदिवासी भागात असून संपूर्ण लोकवस्तीत आदिवासी बांधवांची संख्या अधिक आहे. या परिसरात पावसाळ्यात भातलागवडीनंतर रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट असतो. या स्थळांना पर्यटनकेंद्र व इको टुरिझमचा दर्जा 2017मध्ये मिळाल्याने स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या पावसाळ्यातही धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातल्याने आदिवासी बांधवाना मिळणाऱ्या रोजगारावर पाणी फिरले आहे.
विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ -
अशोक धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती आहे. पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या, फळे, फुले व जंगलातील विविध उत्पादिते उपलब्ध असतात. विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढल्यानंतर येथील स्थानिक रहिवासी फळे, रानभाज्या, मासे, मटण भाकरीची विक्री करीत असतात. पर्यटकांना याच स्थानिकांच्या मदतीने अस्सल घरगुती जेवण आणि इतर खाद्यपदार्थाची चव चाखता येते. स्थानिकांनाही यातून चांगला रोजगार मिळतो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाकडून म्हणून पर्यटनस्थळावर बंदी आणण्यात आली आहे. यामुळे आदिवासींना रोजगाराचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा स्थानिकांना होती. मात्र, गेल्या मंगळवारी जिल्हा प्रशासनाने पुन्हा संपूर्ण पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर बंदी घातली. यामुळे धबधबा परिसरात पर्यटकांची रेलचेल तुरळक असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - अलमट्टीमुळे नव्हे तर 'या'मुळे सांगलीत निर्माण होणार बॅकवॉटरचा धोका
३० फूट उंचीवरून कोसळतो धबधबा -
नाशिक-मुंबई महामार्गावरील कसाऱ्यापासून 15 किमीवर विहीगांव फाटकात दादर नावाचा तिठा लागतो. या तिठ्यावरून उतरून पुढे गावातून पायी अशोका या धबधब्यावर पोहोचता येते. चालतांना वाटेत विस्तीर्ण हिरवीगार शेती लागते. समोरील दाट धुक्याच्या दुलईतले डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याखालील विसावलेले ओलाचिंब गांव पाहताना एखाद्या निसर्ग चित्रासारखेच भासते. पुढे सरळ पश्चिमेस गेल्यावर गावात बांधण्यात आलेला मोठा बंधारा पहावयास मिळतो या बंधाऱ्याजवळ हे सारे जलप्रवाह एकत्र येऊन पुढे तो प्रवाह मोठा होऊन जवळील खोल दरीत कोसळतो. हा प्रवाह सुमारे ३० फूट उंचीवरून धबधब्याचे रुप घेऊन कोसळतो. या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या वतीने २०१८ साली ३२ लाखांचा निधी खर्च करीत अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायऱ्या व रेलिंग उभारण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे.
'अशोका' धबधबा नाव कसे पडले?
२००१ साली प्रदर्शित झालेल्या अशोका या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान व करिना कपूर यांच्या एका गीताचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील पंचमढीच्या ‘अप्सरा विहार’ नावाच्या धबधब्याभोवती झाले. या धबधब्याचे रुप विहीगावच्या धबधब्याशी मिळते जुळते आहे. अशोका चित्रपटातील ‘सन सना ना..’ या गीतामधील ‘अप्सरा विहार’ हा धबधबा हुबेहूब अशोका’ धबधब्यासारखा दिसतो. कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाईचा हा परिसर एकसारखाच भासतो. यामुळे धबधब्याला ‘अशोका’ असे नाव पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO- लग्नानंतर नववधुला खाद्यांवर उचलून नेत वर नदी पार!