ठाणे - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी जाहीर झाली. गेल्या तीन निवडणुकीतील आरक्षणाच्या स्थितीवरून निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांनुसार पार पडलेल्या या सोडतीत अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरातील दिग्गजांना धक्का बसला आहे. दोन्ही शहरातील नगराध्यक्षांसह, ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी दोन्ही शहरातील लोकप्रतिनिधींनी सुरक्षित प्रभागांसाठी चाचपणी सुरू केली आहे.
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 17 मे ला संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी दोन्ही नगरपालिकेतील प्रभागांच्या आरक्षण सोडती मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. मंगळवारी सकाळी 10 वाजता अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे आणि निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी अविनाश सनद यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. महापालिकेच्या स्थापनेपूर्वीचीही ही शेवटची निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या सोडतीबद्दल उत्सुकता होती.
हेही वाचा - 'सातत्याने निष्ठा बदलणे, सत्तेच्या मागे जाणे म्हणजे गणेश नाईकांची मजबुती नाही'
निवडणुक आयोगाने नव्याने जारी केलेल्या निकषांनुसार 2005, 2010 आणि 2015 च्या पालिका निवडणुकांच्या आरक्षणाला ग्राह्य धरत चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार विद्यमान नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांचा प्रभाग अनुसूचित जातींसाठी तर माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांचा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनाही या आरक्षणाचा फटका बसला. त्यांचा आणि त्यांचे पुत्र सचिन पाटील या दोघांचेही प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले. माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांचाही प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्याचवेळी विद्यमान उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचा प्रभाग सर्वसाधारण राहिल्याने त्यांना दिलासा मिळाला.
हेही वाचा - नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 शिवसैनिक भाजपमध्ये
दुसरीकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रभागांतील आरक्षणासाठीही मंगळवारी दुपारी 3 वाजता आदर्श विद्यालयाच्या सभागृहात सोडत पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आर. बी. थोटे यांनी काम पाहिले. या सोडतीत विद्यमान नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांचा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शरद तेली, संभाजी शिंदे, संजय भोईर, शिवसेनेचे मुकुंद भोईर, श्रीधर पाटील, अरूण सुरवळ यांचेही प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख आणि नगरसेवक आशिष दामले यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा प्रभाग मात्र सर्वसाधारण राहिला आहे. या आरक्षणांमुळे दिग्गज नगरसेवकांनी सुरक्षित प्रभाग शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.