ठाणे - बदलापूर पूर्व हद्दीतील एमआयडीसीतील एका कंपनीत वायू गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 'नोबल मीडिया इंटर प्रायव्हेट लिमिटेड' असे वायू गळती झालेल्या रासायनिक बनवणाऱ्या कंपनीचे नाव असून, रात्री नऊच्या सुमारास अचानक वायुगळती झाल्याने एमआयडीसी परिसरासह शिवाजी चौक, आपटेवाडी, शिरगाव या परिसरातील नागरिकांना या वायूगळतीचा त्रास जाणवला. या परिसरातील रस्त्यावरून चालणारे नागरिक समोरच्याला दिसत नव्हते, इतकी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली असून, घटनास्थळी बदलापूर नगरपालीकेचे अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व एमआयडीसीचे अग्निशमन दलाचे जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण आणून सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
'प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष'
घटनेची माहिती मिळताच बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने शर्थीचे प्रयत्न करून, ही गॅस गळती बंद केल्याची माहिती अग्निशमक अधिकारी भागवत सोनवणे यांनी दिली. या गॅस गळतीमुळे शिरगाव, आपटेवाडी परिसरातील अनेक नागरिकांना जळजळ आणि उलट्यांचा तसेच, श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. एवढी मोठ्या प्रमाणात वायुगळती होऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत घटनास्थळाकडे फिरकलेही नाहीत. अग्निशामक दल आणि बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र, अशा पद्धतीने गॅस गळती होत असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या एमआयडीसीच्या गॅसगळतीमुळे बदलापूर परिसरात प्रचंड दहशत असे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळाले आहे.