ठाणे - ठाण्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या घाणेकर नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचा प्रकार समोर आला होता. मराठी अभिनेता भरत जाधव यांनी प्रशासनाची पोलखोल करत फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत नाट्यगृहातील सोयी-सुविधांच्या अभावाबद्दल सांगितले होते.
या प्रकारानंतर पालिका प्रशासनाने दरवाजा उघडा राहिल्यामुळे एसीची हवा लागत नसल्याचे सांगितले. मात्र, आता याबाबत प्रशासनाची पोलखोल झाली असून प्रशासनाने दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे. घाणेकर नाट्यगृहामध्ये याआधीही अनेकदा अपघात झाले आहेत. याठिकाणीच एकदा काही प्रेक्षक अनेक तास लिफ्टमध्ये अडकले होते. तर एकदा घाणेकर नाट्यगृहाचे पीओपीचे प्लास्टर कोसळून मोठा अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, त्यानंतर अनेक महिने घाणेकर नाट्यगृह बंद होते.
आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घाणेकर नाट्यगृहांची अवस्था बिकट झाली आहे. याच बाबतीत घाणेकर नाट्यगृहाचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला असून दुरुस्तीचं काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे पुढील काही महिने घाणेकर नाट्यगृह पुन्हा बंद असणार आहे.