ठाणे - महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्त कारवाई करीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
दिवसभरात विविध प्रकारचे 41 वाहने केली जप्त
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार 'ब' प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते आणि 'क, प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यासह दिवसभर संयुक्त मोहिम राबवून कल्याण मधील रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची कारवाई केली. या कारवाईत पालिकेच्या दोन्ही प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने कल्याण वाहतूक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या सहकार्याने आधारवाडी ते कोकणरत्न हॉटेल परिसर, वसंत व्हॅली, गोदरेज हिल परिसर तसेच आधारवाडी ते चिकणघर हायवे या परिसरातून (क प्रभागक्षेत्र परिसरातील 6 चारचाकी वाहने, एक रिक्षा, अशी 7 वाहने व ब प्रभागक्षेत्र परिसरातून 8 चारचाकी वाहने, 4 रिक्षा व 22 दुचाकी वाहने, अशी एकूण 34 वाहने) एकूण 41 वाहने, 2 हायड्रा (क्रेन), 1 जेसीबी व 2 डंपरच्या सहायाने उचलून वसंत व्हॅली डेपो येथे जमा करण्यात आली आहेत.
वाहन सोडविताना चालकांना दंड भरावा लागणार
जप्त करण्यात आलेली वाहने सोडविण्यासाठी वाहन चालकांना दंड भरावा लागणार असून वाहतुकीला अडथडा ठरणाऱ्या रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे अधिकारी सुखदेव पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - डोंबिवली एमआयडीसी प्रदूषणाचा प्रश्न जैसे-थे; नागरी वसाहतीला धोका कायम, उपाययोजना कागदावरच
हेही वाचा - ठाण्यात बाईक चोरट्याला अटक; 6 बाईकसह डझनभर बॅटऱ्या जप्त