ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर एका टेम्पो चालकास धारधार ब्लेडचा धाक दाखवून जबरीने लुटणाऱ्या त्रिकृटाचा शोध घेऊन कोनगाव पोलिसांच्या पथकाला गजाआड करण्यात यश आले आहे. सुरज संजू पाटील (वय, 26), संतोष जग्गू सुरेला उर्फ पालकवाला, अभिषेक संभाजी देशमुख (सर्व रा. कामतघर, भिवंडी) असे गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी मोबाईल आणि काही रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
नाशिक मध्ये राहणारे मोहम्मद जावेद मोहम्मद शरीफ शहा हे नाशिक वरून मुंबईला भाजीपाला तसेच बटाट्याची एका टेम्पोमधून वाहतूक करतात. शनिवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो चालक मोहम्मद (टेम्पो क्र. एमएच 15 एचएच 0685) या मधुन बटाटे घेऊन कल्याणला येत होता. त्यावेळी मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली पाडानजीक आरोपी त्रिकुटाने त्याच्या दुचाकीवरून पाठलाग करित, टेम्पो चालकास गाडी रोक, तूने हमे कट क्यू मारा असे बोलून दुचाकी टेम्पो समोर आडवी लावली. त्यानंतर तिन्ही आरोपीनी टेम्पोच्या केबिनमध्ये घुसून टेम्पो चालक शहा व त्याच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. शाह याने प्रतिकार केला असता या आरोपीने धारदार ब्लेडचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील काही रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. विशेष म्हणजे आरोपी पळून जाताना त्यांनी टेम्पोच्या काचेवर दगड मारून काच देखील फोडली होती. याप्रकरणी टेम्पो चालक शहा यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
24 तासाच्या आत अटक
टेम्पो चालक शहा यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वामन सूर्यवंशी, पोलीस हवालदार राजेश शिंदे, मोरे, पोलीस नाईक मासरे, संतोष पवार, करवंदे, शिंदे, कृष्णा महाले या पथकाने कसोशीने शोध घेऊन तिन्ही आरोपींना भिवंडी शहरातील कामतघर परिसरातून 24 तासाच्या आतच अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.