पनवेल - महिला विधीज्ञ अश्विनी थवई यांचा खोटा कोरोना अहवाल व मृत्यू प्रकरणी पनवेल व वाशीतील एकूण सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अश्विनी थवई यांना त्यांच्या नातेवाईकांनाी उपचारासाठी मे महिन्यात पनवेलमधील पटेल रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांच्यावर शस्रक्रिया केली जात असताना त्या अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांची रवानगी पटेल रुग्णालयातून गांधी रुग्णालयात केली. गांधी रुग्णालयात अश्विनी यांना एक दिवस अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवून दुसऱ्या दिवशी मृत घोषित केले होते. पटेल रुग्णालयात अश्विनी यांच्यावर शस्रक्रिया करताना डॉ. धर्मेश मेहता यांनी त्यांना भूल दिली व डॉ. कृतिका पटेल या अश्विनीवर शस्रक्रिया करत होत्या. अश्विनी यांना जास्त प्रमाणात भूल दिल्यामुळे शस्रक्रियेदरम्यान त्यांचा जास्त रक्तस्राव झाला व अश्विनीचा मृत्यू पटेल रुग्णालयामध्ये झाला, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र, तरीही मृत अश्विनी गांधी रुग्णालयानेही एक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप करत मृत अश्विनीचे पती निशांत थवई यांनी पवनेल शहर पोलिसांकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी कारवाई न केल्याने मृत महिलेच्या पतीची न्यायलयात धाव
पोलिसांनी या प्रकरणात काहीच कारवाई न केल्याचा आरोप करत अश्विनी यांचे पती निशांत थवई यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली. पटेल व गांधी रुग्णालयाकडून प्रकरण दडपण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. पनवेल व वाशीतील सहा डॉक्टरांवर नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला. अश्विनी यांच्या रक्ताचे नमुने वाशीतील यूडीसी सेटेलाईट लॅबोरेटरीसह अन्य चार लॅबकडे तपासणीसाठी पाठविले होते. या चारही लॅबनी अश्विनी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला होता. पनवेलमधील गांधी रुग्णालयाने घडल्या प्रकारावर पांघरूण घालण्यासाठी अश्विनी यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे भासविले होते व वाशीतील यूडीसी सेटेलाईट लॅबोरेटरीमधून मृत अश्विनी यांचा खोटा कोविड पॉझिटिव्ह अहवाल बनवून घेतल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पटेल रुग्णालय प्रशासनाने प्रतिक्रिया देणे टाळले
याबाबत पटेल प्रशासनाच्या रमेश पटेल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
हेही वाचा - पनवेलमध्ये रस्त्यांवरील खड्डयांवरुन मनसे आक्रमक; श्राद्ध घालत सिडकोचा केला निषेध