ठाणे - मीरा भाईंदर शहरातील दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना काशी मीरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मीरा भाईंदर शहरातील काशी मीरा पोलिसांनी कारवाईचा झपाटा लावला आहे. मोबाइल चोर, मोटार सायकल चोरांनंतर आता घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना सीसीटीव्हीच्या साहाय्याने ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी हटकेश परिसरातील तेजल अक्वा सर्व्हिसेस, हरिया ड्रीम पार्क मधील दुकानाचे शटर उचकटून वॉटर प्युरीफायर सिस्टीमचे ४ मशीन असे एकूण ६५ हजार ५०० किंमतीचा माल चोरीला गेला होता.
या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये संशयित रिक्षा असल्याचे आढळून आले. या रिक्षाच्या पत्त्याच्या मदतीने पोलिसांनी अंधेरीतून आरोपी अस्लम कादर सय्यद, अहमद कादर सय्यद, जावेद उर्फ बाबर मुन्ना शाह अशा तीन आरोपींना अटक केली आहे. यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. काशी मीरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.